स्मृतीबनातून – शब्द सूरांची मोहिनी


शब्द सूरांची मोहिनी



सारीपाटाचा मूळ खेळ आपल्यापैकी अनेकांनी जरी खेळला नसला तरी पुराणातल्या शिव–पार्वती यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या डावांचं किंवा महाभारतातल्या कौरव–पांडव यांच्यातल्या अविवेकी संघर्षाची कथा आपणाला ठाऊक असते. सारीपाटाचा पट हा गणितातल्या अधिकच्या चिन्हासारखा (+) असतो. त्याला चार बाजू आणि प्रत्येक बाजूला २४ घरे  असतात. बाकी या खेळाचे आपण खेळतो त्या चौसर किंवा बहुतेकांना माहीत असलेल्या ल्युडोशी बरंच साधर्म्य असतं. सारीपाट खेळात नरद म्हणजे मोहरे, पक्क घर म्हणजे फुलीचं घर, एकाच घरात दोन सोंगट्या आल्या तर ते जुग, प्रतिस्पर्ध्यांच्या सोंगट्यांची अडवणूक करणारी रचना म्हणजे चिरे, पटाच्या प्रत्येक बाजूची मधली सुरक्षित रांग म्हणजे पोटघर अशा काही पारंपरिक संज्ञा वापरल्या जातात. या सगळ्याचा इथे ऊहापोह करण्याचं कारण म्हणजे हा खेळ आणि या संज्ञाचा प्रतिकात्मक उपयोग करून कवी राजा बढे यांनी एक उत्कट प्रीतकव्य लिहिलं आणि मराठी भावसंगीताचे जनक गजानन वाटावे यांनी चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात या काव्याला, शिवरंजनीच्या सूरात सजवून, गाऊन ते अजरामर करून टाकलं. प्रितीच्या खेळात मग ते मराठमोळं ‘नयने लाजवित’ असो वा उर्दू तहजीब असणारे ‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं’ असो; नेत्रपलवीचं महात्म्य निर्विवाद आहे. बरं या खेळात सर्वसाधारण खेळा सारखं केवळ जिंकणंच नाही तर हारणं ही मोहक, कृतार्थतेची अनुभूती देणारं कसं असू शकतं ते या गीतातून स्पष्ट होतं. 

मोहुनिया तुजसंगें नयन खेळले जुगार
ओठावरले हासे फेकियले रे फासे
खेळाचा होय निकर, हो जिवलग जादुगार 

घर, दार, नोकरी, पगार वगैरे सर्व जाणून घेतल्या नंतर जे काही केलं जातं त्यात प्रीती पेक्षा रितीचा वरचष्मा असतो. पण Love at first sight; पाहताक्षणीच प्रेमात पडणाऱ्यांचा मात्र या बाबींकडे कानाडोळा होत असावा. इथे त्याच्या रुपाचं, व्यक्तिमत्वाचं तिच्या मनात असं काही आकर्षण निर्माण होतं की त्याच्या बद्दल काहीही न जाणून घेता प्रेमाचा हा सारीपाटाचा खेळ, म्हणजे एकप्रकारचा जुगार ही सुनयना खेळू लागते. 

‘नयन खेळले जुगार’ ही प्रतिमा अतिशय उत्कट आणि बोलकी आहे. जुगारात जशी हार-जीत अनिश्चित असते, तसच काहीसं प्रेमाचं ही आहे. प्रेमातही सर्वस्व विसरून स्वतःला झोकून द्यावं लागतं हे वास्तव कवीनं अत्यंत नाजूकपणे अधोरेखित केलं आहे.

सारीपाटाच्या खेळात सोंगटी पुढे चालविण्यासाठी फासे टाकले जातात तद्वतच त्याच्या ओठांवरलं मोहक मंद हास्य तिला त्यानं टाकलेले प्रेमाचे फासेच वाटतात. ती आकर्षित होऊन प्रेमाचा खेळ(जुगार) खेळायला प्रवृत्त होते. हळूहळू हा खेळ असा काही रंगात येतो; ते हास्य तिच्यावर अशी काही जादु करतं, की नकळत ती या खेळात हरू लागते. त्याच्याकडे अधिकच आकृष्ट होते.

सहज पडे तुजसि दान
लागले पणास प्राण
मीपणांत मन हरलें- येई रे गळ्यांत हार 

तीचं त्याच्याकडे अधिकाधिक आकर्षित होणं हे त्याला पडणारं अनुकूल दान आहे त्यामुळे त्याला पुढे चाल मिळते आहे अशी सुंदर कल्पना कवीनं केली आहे. अनुकूल दान विनासायास पडलं तर समोरच्या खेळाडूचा जिंकण्याचा निर्धार विफल होतो. या रूपगर्वितेला असलेला आपल्या रूपाचा गर्व गळून पडतो आहे. त्याला विशेष प्रयत्न न करताच तिचं प्रेम दान अनुकूल पडतं आहे. ती मात्र तिचे प्राणच पणाला लावून आपलं  हृदय हरली आहे. ते ही स्वखुशीनं. आता फक्त विजयश्रीनेच काय ती त्याच्या गळ्यात माळ घालायची बाकी आहे अशी काव्यात्मक मांडणी करत असताना खेळातली हार आणि गळ्यातला हार असा श्लेष कवीनं सहजीच साधला आहे.    

सारिलेस मोहरें
सहज अडविलेस चिरे
बंद जाहली घरें- खेळ संपणार पार 

प्रीतीचा खेळ सारीपाटा प्रमाणेच सोपा नाही. वाटेत किती अडथळे असतात. पण त्यानी आपले मोहरे(सोंगट्या) मोठ्या कौशल्यपूर्वक सरकवून तिच्या मनाचा असा काही ताबा घेतला आहे की इतर कोणताच विचार आता ती करू शकणार नाही अशी योजना करून प्रेमाच्या या खेळात तिची, तिलाही हवीहवीशी वाटेल अशी हार सुनिश्चित केली आहे.

पळभर जरि जुग जुळलें
कटिवरुनी वरि सरले
एकुलती एक नरद पोटघरी होय ठार
पटावरुन लाजरे पळे घरांत मोहरे

 या खेळात जेव्हा दोन सोंगट्या एकाच घरात असतात तेव्हा त्याला जुग असं म्हटलं जातं. दोन्ही सोंगट्यांना अभय असतं. तिची आणि त्याचीही अशीच क्षणभर नजरानजर झाली; त्यावेळी ती लगेचच त्याच्या प्रेमात पडते असं नाही. आपल्या रूप सौंदर्याची जाणीव, बहुतेक स्त्रीवर्गाला असते तशी ती तिलाही असतेच. सारीपाटाच्या खेळात सोंगटी कडेच्या रांगेतून सरकत पुढे जात जात मधल्या सुरक्षित रांगेत वर सरकते. त्याप्रमाणेच सुरवातीची नजरानजर झाल्यानंतर, हळुवार फुलत गेलेली जवळीक, सहजीच कटीस्थानावरून फिरलेली नजर, हा मुग्ध शृंगारीक भाव कवी राजा बढे यांनी त्यांच्या नावाला साजेशा संयत आणि घरंदाजपणे सूचित केला आहे. सहज दृष्टादृष्ट झाल्यानंतर खेळ तिथेच थांबून न राहता पुढे सरकत जातो आणि ती(नरद/सोंगटी) ध्यानीमनी काही नसताना(पोटघरी/सुरक्षित घर)त्याच्या प्रेम पाशात जशी अडकते तशी, स्त्रीसुलभ लज्जेनं मग स्वगृही पळून जाते. 'श्लेष' अलंकाराच्या आत्यंतिक कलात्मक आणि रूपकात्मक अभिव्यक्तीनं अश्लीलता किंवा उथळपणा हद्दपार ठेवण्यात कवी संपूर्णतः यशस्वी झाला आहे. अत्यंत तरल, शालीन आणि मधुर शृंगारभाव प्रवाहित करणं हे निर्विवादपणे या ओळीचं खरं सौंदर्य आहे. राजा बढे यांच्या शब्दांना एक नैसर्गिक लय आहे. शब्दांची निवड इतकी तरल आहे की वाचताना/ऐकताना मनात एक शांत आणि हळुवार सूर उमटतो. त्याचा कस्तुरी सुगंध दरवळू लागतो. गंमत म्हणजे या सौंदर्याचं जन्मस्थान होतं, शिवाजी पार्क ते वरळी नका बस प्रवासाचं तिकीट असं माझ्या वाचनात आलं. अवचित वेळ,अवचित स्थानं हीच सर्जनासाठी पोषक ठरत असावी बहुदा.

या प्रेमालापाची कथा कवीच्या कल्पनाविलासातून सारीपाटाच्या रूपकाद्वारे अत्यंत चपखलपणे उतरली आहे. पाहता पाहता नायकाच्या प्रेमात पडलेली नायिका,  त्यांच्यातील मुग्ध नर्मशृंगार कवीकडून असा कलात्मक रीतीनं मांडून झाल्यानंतर  संगीतकार, गायक गजानन वाटवे यांनी त्यासाठी शिवरंजनीच्या आर्त, हळव्या सूरांची तितकीच समर्पक महिरप घडवली. प्रितीची मधाळता आणि मानसीची हुरहूर अगदी सहज भावाने प्रकट करण्यासाठी कदाचित शिवरंजनी व्यतिरिक्त अन्य उत्तम पर्याय असू शकत नाही. गजानन वाटवे यांनी कोमल गंधाराचा वापर करून काव्यामधल्या वेदनेचं आणि समर्पणाची सरमिसळ अगदी बेमालूमपणे केली आहे. थोडक्यात  शिवरंजनीचं शास्त्र, माधुर्य अत्यंत सुगमतेनं भाव संगीताच्या पात्रातून श्रोत्यांच्या थेट काळजात ओतलं आहे. 

गजानन वाटवे स्वतःला केवळ गायक नाही तर 'काव्यगायक' म्हणवून घेत असत. १९४० आणि ५० च्या दशकात पुण्यात चौकाचौकांत तसंच गणेशोत्सवात त्यांच्या कार्यक्रमांना तुडुंब गर्दी होत असे. याच काळात ते काव्यगायक म्हणून नावलौकिक मिळवत होते. साधारण याच सुमारास राजा बढे हे ही नागपूर वरून पुण्यनगरीत दाखल झाले. त्यांच्या काव्यातील नादमाधुर्य आणि सुकोमल शब्दरचना वाटवे यांना इतकी भावली की ते नेहमी त्यांच्या नव्या कवितांच्या शोधात असत. दोघांची भेट झाली की तासनतास काव्य वाचन आणि त्यांना चाली देण्याचे प्रयोग रंगत असत. शब्द सुरांच्या या अलौकिक नात्यातूनच ‘नयन खेळले जुगार’ आणि अन्य गाण्यांचा जन्म झाला. वाटवे यांच्या कुठल्याही मैफिलित श्रोत्यांकडून राजा बढे यांच्या गीतांची हमखास फर्माईश होत असे. 'मोहुनिया तुजसंगें' ‘राधे तुझा सैल अंबाडा', आणि 'चांदणे शिंपीत जाशी' ही गाणी त्यांच्या मैफिलींची त्या काळात अविभाज्य घटक होऊन गेली होती. मनोरंजन क्षेत्र हे त्याकाळी मनोरंजनालाच अधिक वाहिलेलं होतं. त्याला छद्म व्यावसायिकतेचं रूप आलं नव्हतं. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार नव्हते. परस्परांच्या प्रतिभेबद्दल दाखवायचा नव्हे तर खरोखरचा नितांत आदर होता. हातून उत्तम कलाकृती घडावी हा एकच ध्यास असे. मुख्य म्हणजे स्वतः राजा बढे उत्तम गायक होते. नाट्य, चित्रपट, आकाशवाणीशी जोडलेले होते. वाटवे यांच्या गळ्यातून आपण लिहिलेलं काव्य कसं उमटेल याचा अंदाज घेऊन ते लिहित असत. त्याचवेळी कवीला अभिप्रेत असलेला अर्थाशय वाटवे अगदी नेमकेपणानं सूरांतून व्यक्त करत असत.

वाटवे यांच 'मोहूनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे गीत आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातूनही इतकं लोकप्रिय झालं होतं की शिवरंजनीच्या हळव्या सुरावटीची मोहिनी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या शंकर–जयकिसन या राजकपूर कॅम्प मधल्या संगीतकार जोडीतल्या शंकर यांना पडली होती. संगीत विश्वात या संदर्भात एक किस्सा प्रचलित आहे. 1970 साली ‘मेरा नाम जोकर’च्या ‘जाने कहाँ गये वो दिन’साठी राजकपर एका थेट काळीज चिरून टाकेल अशा चालीच्या शोधात होता. संगीत अर्थातच शंकर–जयकिसन ही जोडीत करणार होती. त्यांचे मुख्य साहाय्यक होते तालवाद्य वादक दत्ताराम. या दोघांनाही मराठी संगीत प्रवाहाची चांगली जाण होती. 'नयन खेळले जुगार' शंकर यांच्या अतिर्मनात रुंजी घालतच होतं. त्यांनी या भावगीताच्या चालीच्या  पावलावर पाऊल टाकत मोठ्या वाद्यवृंदासह 'जाने कहाँ गए वो दिन' ला चाल बांधली. ती खूपच लोकप्रिय झाली आणि त्यांच्या गळ्यात हार पडले ‘मीपणांत मन हरलें- येई रे गळ्यांत हार’ राजा बढे यांचे शब्द वाटवे यांच्या चीच्या संदर्भात असेही खरे ठरले.

रूपक अलंकारांचा प्रभावी वापर, नादमाधुर्य आणि शिवरंजनी सूरांवर आधारित हळुवार चाल यामुळे मराठी भावगीतसृष्टीत हे गीत अमरपट्टा मिरवत राहणार.

दिवाळीत नरक चतुर्दशीला नरकासुर वध आख्यान असलेलं कीर्तन पहाटे आकाशवाणीवर ऐकणं गेली अनेक वर्ष माझ्या अंगवळणी पडलं आहे. शास्त्रीय संगीताच्या शास्त्राशी माझा सलोखा नसूनही त्यादिवशी पूर्वरंगात बुवांनी शिवरंजनीतला अभंग घेतला आणि त्यांच्या आलापीवर माझ्या अंतर मनात वयवर्ष ऐंशीचं ‘मोहूनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे शब्द नर्तन करू  लागले. कीर्तन तासाभरात संपलं. मात्र दिवाळी संपली तरी अंतरात नयनांचा जुगार अद्यापही सुरूच आहे.

गजानन वाटवे 

https://youtu.be/6XBc-MUZIo4?si=A3GduTeTzzdxivTD 

हरीकेश 

https://youtu.be/og8qWm8bvrI?si=HqZRnR649oIc8hBA


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

1211261650

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

स्मृतीबनातून - तरूतळीची विरहिणी

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन