स्मृतीबनातून – लेखनप्रिया(पद्य)
लेखन–प्रिया
काही लिहू लागलो की होती तुझेच भास
काना मात्रा मधून तनुचे तुझ्या आभास
निर्लेप चेहरा तुझा, कोवळा ही असा की
तळ्यातली भूर्जपत्र, मज दिलीत लेखनासी
बिंब भाळीचे, विलसणारे उठावदार
सांगू परी काय, मज भासते अनुस्वार
गौर गाली लांबलेली, बट काळी सुरेख
गमते मला जणू, अक्षरा वरील रेख
रेखीव डोळ्यांवर, भुवयांच्या त्या कोलांट्या
दिसती मला सदा त्या, शब्दांतील वेलांट्या
कुसुमी ओष्ठांवर, वसले नित्य सुहास्य
उलगडे अलवार, ओळींतील रहस्य
आखीव करकमले, दोन्ही अती सुरेख
उभी ठाकली जणू ती काना मात्रेचे रुप
वाचतो जेव्हा स्वये, ही माझीच लेखनकृती
वाटे सदा मला, असे तुझीच देहाकृती
नितीन सप्रे
160520261300

नितीन जी,
उत्तर द्याहटवाजे न देखे रवी ते देखे कवी.
तुमच्यातील कवीने किती सुरेख रेखाटले चित्रातील शब्द चित्र.
वा!
शब्द आणि चित्र दोन्ही सुरेखं. 🙏💐